breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

शेर अकेला ही काफी है… माजी आमदार विलास लांडे यांची जोरदार मोर्चेबांधणी

प्रदेश नेतृत्वाशी संपर्क वाढवला : प्रदेशाध्यक्षांसह प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘पितामह भीष्म’ अशी ओळख असलेले दिग्गज नेते माजी आमदार विलास लांडे यांनी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या थेट संपर्कात राहून भोसरीसह पिंपरी-चिंचवडच्या महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसमोर तगडे आव्हान निर्माण करण्याची तगडी रणनिती लांडे यांच्याकडून आखली जात आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पायउतार व्हावे लागले. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपाला ‘सळो की पळो’ करुन सोडणारे माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे शहर राष्ट्रवादीची धुरा मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांचे ‘शागिर्द’ असलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांना पसंती दर्शवली. परिणामी, शहर राष्ट्रवादीत काहीशी धुसफूस पहायला मिळाली.

दरम्यान, शहर राष्ट्रवादीतील गटा-तटाच्या राजकारणाला फाटा देत माजी आमदार लांडे यांनी ‘‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥’’ या भगवद्गगीतेतील विचारानुसार पिंपरी-चिंचवड आणि भोसरीच्या संपन्नतेसाठी काम करण्याची भूमिका ठेवलेली पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच त्यांनी दिवाळीनिमित्त भेट घेतली. दिवाळीचे निमित्त असले तरी, पाटील आणि लांडे यांच्यात भोसरी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. यावेळी उद्योजक अशोक तनपुरे, उद्योजक उदय येळे, उद्योजक दत्तात्रय दिवटे उपस्थित होते.

तत्पूर्वी, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे १२५ कोटींचे उभे राहत असलेल्या भव्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर संदर्भात गोविंद बाग, बारामती येथे राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद-पाटील आणि मंदिराच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात समाज जागृती करणारे शब्दप्रभू ह.भ.प पंकज महाराज गावडे उपस्थित होते. विशेष म्हणजे, शरद पवार यांनी मंदिराच्या उभारणीबाबत सर्व माहिती जाणून घेतली आणि सुरू असलेल्या कामाबद्दल समाधानही व्यक्त केले. यावेळी वारकरी शिक्षण संस्था आळंदी प्रकाशित वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कृत सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम महाराजांच्या जीवनावरील पुस्तके देऊन पवार यांचा सन्मान केला. त्यानंतर संसदरत्न खासदार सुप्रिया यांचीही त्यांनी भेट घेतली.

शहरातील सत्ताबदलानंतर काही प्रमाणात राजकीयदृष्या अलिप्त राहिलेले माजी आमदार लांडे आता नव्या संकल्पासह कामाला लागले आहेत. अत्यंत शांत, संयमी आणि सावध वाटचाल करीत भाजपाचा उधळलेला अश्वरथ रोखण्यासाठी व्यूव्हरचना आखली जात आहे. शहर राष्ट्रवादीच्या संघटनात्मक  पदांवरील सर्वच पदाधिकारी आमदार लांडे यांना ‘ज्युनिअर’ आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मानपान आणि सन्मानाची अपेक्षा न करता पक्षहितासाठी स्वाभीमानाने लढा उभारण्याची तयारी लांडे यांनी केली आहे. २०१७ मध्ये भाजपाने ‘राम-लक्ष्मण जोडी…भाजपा के दो शेर’… अशी ब्रँडिंग करीत सत्ता मिळवली होती. मात्र, आता वाऱ्याची दिशा बदलली आहे. भाजपा आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘शेर अकेला ही काफी है…’ अर्थात विलास लांडे शहरातील राजकीय गणिते आजही बदलू शकतात, असा विश्वास राष्ट्रवादीतील काही जुन्या-जाणत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा…

भोसरी विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार असलेले विलास लांडे यांना २०१४ आणि २०१९ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यापूर्वी, २००९ आणि २०१९ असे दोनदा शिरुर लोकसभा मतदार संघासाठी दंड थोपाटले होते. आता २०२४ मध्ये लांडे पुन्हा एकदा भोसरी विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात दिसणार आहेत. कारण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत असताना लांडे यांनी त्यांना भेटवस्तू दिली. त्यावर ‘संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा’ अशा ओळी मुद्रित केल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार महेश लांडगे आणि लांडे यांच्यातच २०२४ ची लढत होणार हे निश्चित आहे. आमदार लांडगे विरोधी गटाची साथ आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची संघटनात्मक ताकद असे समीकरण यशस्वी करण्यासाठी आतापासूनच लांडे यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक म्हणून चर्चेत असलेल्या गव्हाणे यांना २०२९ ची वाट पहावी लागेल, असे निरीक्षण राजकीय जणकारांनी नोंदवले आहे.

नाराजांची मोट बांधण्याची क्षमता पण…

राज्यात सत्ता बदल झालेला असला तरी राष्ट्रवादीसह भारतीय जनता पार्टीतील नाराजांची मोट बांधण्याची पूर्ण क्षमता माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे आहे. सध्यस्थितीला राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे गट, माजी महापौर संजोग वाघेरे गट, माजी महापौर आझमभाई पानसरे गट, माजी महापौर योगेश बहल गट असे चित्र आहे. दुसरीकडे, भाजपाचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांच्यावर नाराज असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून माजी आमदार लांडे यांना संघटनात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नाही. अन्यथा शहरात नाराजांची मोट बांधून राष्ट्रवादी विरोधात असतानाही सत्ता स्थापनेचा ‘करिष्मा’ करु शकते, असा दावा राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button