breaking-newsताज्या घडामोडी

संतोष परब हल्ला प्रकरण : अखेर नितेश राणे न्यायालयासमोर झाले हजर

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी आमदार नितेश राणे अखेर आज न्यायालयासमोर शरण झाले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळून लावल्यानंतर राणे काय करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, नितेश राणे यांनी न्यायालयासमोर शरण जाण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीच्या काळात शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप करण्यात आले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हा हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून, करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला होता.

‘न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत आहे,’ असं आमदार नितेश राणे यांनी न्यायालयासमोर हजर होण्यापूर्वी सांगितलं. दरम्यान, न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवली न्यायालयासमोर स्वतःहुन हजर झाले. बुधवारी (2 जानेवारी) दुपारी ते कणकवली न्यायालयासमोर हजर झाले. त्यांच्यासोबत वकील संग्राम देसाई, वकील राजेंद्र रावराणे, वकील उमेश सावंत, वकील राजू परुळेकर उपस्थित आहेत. त्याचबरोबर भाजपा पदाधिकारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष समीर नलावडे, दिलीप तळेकर, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, संदीप सावंत, मिलींद साटम हेही उपस्थित होते.

दरम्यान, नरडवे नाका व कणकवली न्यायालय परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस सतर्क झाल्याचं दिसत आहे. न्यायालयात जाणाऱ्या गेटवर सर्वांना अटकाव येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button