breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: “छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील”- उपमुख्यमंत्री

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. त्याचबरोबर राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. “छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण केलं.

करोनामुळे अनेक सणसोहळ्यांवर विरजण पडलं असून यंदा शिवराज्याभिषेक दिन मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थित साजरा केला जाणार होत आहे. शुक्रवारी (५ जून) सायंकाळी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ झाला. आज (६ जून) राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होणार आहे.

दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव एकदाच जन्म घेतो आणि अखिल मानवजातीचं कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेलं कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपलं वाटेल, जिथं सर्वांना न्याय मिळेल असं स्वराज्य निर्माण केलं. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. त्यांच्यासारखा राजा मिळाला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचं आपल्या जीवनात सर्वाधिक महत्वं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया,” अशा शब्दात अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button