‘नरेंद्र मोदी जो ब्रँड पितात तोच आदित्य ठाकरेंच्या हातात’; संजय राऊतांचं भाजपाला प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोतील फोटो शेअर केला. यावरून भाजपाने आदित्य ठाकरेंचा एक फोटो शेअर केला. आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हस्की होती? असा सवाल उपस्थित केला. यावरून संजय राऊत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, माझ्या ट्विटमध्ये मी कुणाचं नाव घेतलं का, कुणाच्या विरोधात आरोप केले का? नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की, महाराष्ट्र जळत असताना एक महाशय मकाऊमधे जुगार खेळतायतमात्र भाजप हिट विकेट झालं.. स्वतःच जाहीर केलं ही फोटोतले महाशय त्यांचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत.
हेही वाचा – हिंदूराष्ट्र झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? धीरेंद्र शास्त्री म्हणाले..
भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी जी टीका केली ती योग्यच आहे. मी मनोरुग्ण आहे कारण महाराष्ट्राच्या हिताचा विचार आम्ही करतो. त्यामुळे आम्ही मनोरुग्ण आहोतच. आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात घालण्याला विरोध करत आहोत. एका उद्योगपतीला मुंबई विकण्याला विरोध केल्यामुळे आम्ही मनोरुग्ण वाटत असू तर आम्ही आहोत मनोरुग्ण, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपाने आदित्य ठाकरे यांचा एका बॉलिवूड पार्टीतला फोटो शेअर केला आहे. यामध्ये आदित्य ठाकरे काहीतरी पित असल्याचं दिसत आहे. यावरून भाजपाने आदित्य ठाकरेंचा ब्रँड कोणता? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. नरेंद्र मोदींचा जो ब्रँड आहे तोच ब्रँड आदित्य ठाकरे यांचाही आहे. आदित्य ठाकरे डाएट कोक पित होते. त्या फोटोतही तेच दिसतंय, असं संजय राऊत म्हणाले.