हिंदूराष्ट्र झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? धीरेंद्र शास्त्री म्हणाले..

पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग व दरबार कार्यक्रम पुण्यात होत आहे. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदूराष्ट्राची मागणी करताना मोठं विधान केलं आहे. हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्री यांनी उत्तर दिलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला आहे. मीही संविधानाचा स्वीकार करतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे. पण सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल.
हेही वाचा – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंना संधी
हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, त्यांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता..हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही.. हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल.