breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारण

रविंद्र धंगेकरांचे टेन्शन वाढलं; पुण्यात ठाकरे गट काम करणार नाही?

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वैयक्तिक भेटीगाठी, मेळावे घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपकडून नाराज असलेले सर्वजण सक्रिय झाल्याचे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाची नाराजी स्पष्ट दिसून आली. अगोदर विधानसभा निवडणुकीच्या वेळी कसबा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला जाईल हे आधी जाहीर करा, तरच लोकसभेसाठी काम करू असा पवित्रा ठाकरे गटाने घेतल्याने धंगेकरांचे टेन्शन वाढले आहे.

भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधून इच्छुक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे हे त्यांची नाराजी सोडून सक्रिय झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट) शिवसेना(शिंदे गट) हेही मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीच्या शहर पातळीवरच्या नेत्यांची बैठक नुकतीच कॉँग्रेसभवन येथे पार पडली. बैठक सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. कसबा विधानसभामध्ये यापूर्वी आम्ही भाजपची तळी उचलली, आता कॉँग्रेसची उचलत आहोत. प्रचारात सहभागी होऊ पण विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा शिवसेना ठाकरे गटाला सोडणार असा शब्द द्या असा इशारा देतानाच आम्ही आयुष्यभर दुसऱ्यांच्याच तळ्या उचलायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचीच री ओढत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडूनही विधानसभेसाठी कसब्यावर दावा करण्यात आला आहे.

धंगेकरांच्या अडचणीत वाढ

धंगेकरांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध पहायला मिळत आहे. कॉँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत कॉँग्रेस भवनमध्ये मुक निदर्शने केली. ते या बैठकीला उपस्थित नव्हते. एकीकडे पक्षांतर्गत विरोध आणि आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांची नाराजी यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button