TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

करोनाच्या ‘एक्सबीबी’चा वेगाने प्रसार; ठाण्यात १० रुग्णांची नोंद; मुंबईलाही धोका

मुंबई : सिंगापूर आणि अन्य देशांमध्ये आढळलेला ‘एक्सबीबी’ हा करोनाचा नवीन विषाणू राज्यातही आढळला आहे. राज्यात या विषाणूचे ३६ रुग्ण आढळले. त्यापैकी २१ रुग्ण हे पुण्यातील असून ठाण्यात १० रुग्ण आढळले. परदेशात आढळलेल्या ‘एक्सबीबी’ या नव्या करोना विषाणू प्रकाराचा राज्यात झपाटय़ाने प्रसार होत आहे. आतापर्यंत राज्यात त्याचे ३६ नवीन  रुग्ण आढळले असून त्यापैकी २१ रुग्ण पुण्यातील, १० रुग्ण ठाण्यातील, नागपूरमध्ये दोन, तर अकोला, अमरावती, रायगड येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. मुंबईत अद्याप या विषाणूचे रुग्ण आढळले नसले तरी प्रसार पाहता मुंबईलाही आता ‘एक्सबीबी’ धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘एक्सबीबी’ रुग्णांपैकी सर्वाधिक १४ रुग्ण हे ४१ ते ६० वयोगटातील आहेत. त्याखालोखाल २१ ते ४० वयोगटातील १३ रुग्ण, तर ६० वर्षांवरील ७ रुग्ण आणि ११ ते २० वयोगटातील २ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांमध्ये २२ पुरुष, तर १४ स्त्रिया आहेत.  या ३६ जणांपैकी १९ रुग्णांना काही लक्षणे होती, तर उर्वरित रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले होते.

पुन्हा मुखपट्टी वापरण्याचे आवाहन..

‘एक्सबीबी’ या प्रकाराचा अभ्यास करता या नव्या उपप्रकारामुळे संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले तरी, या नवीन प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव हा सौम्य स्वरूपाचा आहे, असे मत राज्य कृती दलाच्या सदस्यांनी (टास्क फोर्स) व्यक्त केले आहे. रुग्णांना घरगुती विलगीकरणात उपचार देणे शक्य असले तरीही रुग्णालये, दवाखाने अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी मुखपट्टी वापरावी, असे आवाहन राज्य कृती दलाने केले आहे.

१३२ नवे बाधित

मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरू असून शनिवारी दिवसभरात १३२ नव्या रुग्णांची नोंद झाली. शनिवारी १४ करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईतील एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५३ हजार ८६० झाली आहे.  करोनामुळे आतापर्यंत १९ हजार ७३८ वर जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १४६ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत मुंबईत एकूण ११ लाख ३३ हजार ५६१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८.२ टक्के आहे. सध्या ५६१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा दर नऊ हजार ८०३ दिवसांवर पोहोचला आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ३२८

जिल्ह्यात शनिवारी ६० नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे ३१, नवी मुंबई २४, कल्याण डोंबिवली दोन, मीरा भाईंदर एक, उल्हासनगर एक आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात एक रुग्ण आढळला. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३२८ आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button