ताज्या घडामोडीमुंबई

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा

ठाणे  | ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मान्यता दिली. हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसलेले आहे. आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा पर्यावरणाबाबत महत्त्व असलेल्या क्षेत्रांना रामसर क्षेत्र असे म्हटले जाते. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळतात. त्यामुळे या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा विशेष महत्त्व आहे. ठाणे खाडीच्या अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित असून त्यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ डिसेंबर रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या बैठकीत ठाणे खाडी परिसर रामसर क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यानीही या प्रस्तावास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी तो केंद्राला पाठविण्यात येणार आहे. या खाडीला रामसरचा दर्जा मिळल्यानंतर फ्लेमिंगोसह विविध पक्षी व प्रजातींचे अधिक संवर्धन होण्यास मदत मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button