ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळ्यासाठी आता वातानुकूलित लोकल

मुंबई | मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याणपर्यंत मुख्य मार्गावरल धावणारी वातानुकूलित लोकल आता अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळय़ासाठीही धावतील. नव्याने झालेल्या ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गामुळे आणखी ३६ लोकल फेऱ्या वाढणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून या फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत येणार असून यामध्ये ३४ फेऱ्या वातानुकूलित आणि दोन विना वातानुकूलित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी १८ फेब्रुवारीला दृकश्राव्य माध्यमातून (व्हिडीओ कॉन्फरन्स) ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण होणार असून यावेळी ३६ वाढीव लोकल फेऱ्यांनाही हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या १० वरून ४४ होणार असून यातील २५ फेऱ्या जलद मार्गावर आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण धीम्या मार्गावर आता ३४ वातानुकूलित फेऱ्या होणार असून कल्याणबरोबरच अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळय़ासाठीही फेऱ्या होतील. यात दादर, सीएसएमटी ते बदलापूर दरम्यान चार जलद लोकल फेऱ्या, सीएसएमटी ते टिटवाळा दरम्यान अप-डाऊन दोन जलद लोकल फेऱ्या, सीएसएमटी ते अंबरनाथ एक जलद व अंबरनाथ ते सीएसएमटी धीम्या अशा दोन फेऱ्यांचा समावेश आहे.

वातानुकूलित लोकल फेऱ्या

* दादर ते बदलापूर जलद – दु. १२.३०

* बदलापूर ते सीएसएमटी जलद- दु. १.४८

* सीएसएमटी ते टिटवाळा जलद – दु. ३.१९

* टिटवाळा ते सीएसएमटी जलद – सायं.४.४७

* दादर ते बदलापूर जलद- स. ११.०८

* बदलापूर ते सीएसएमटी जलद – दु.१२.२७

* सीएसएमटी ते अंबरनाथ जलद- स.९.५१

* अंबरनाथ ते सीएसएमटी धीमी- स.११.१७

उद्घाटन कार्यक्रमामुळे ठाणे पूर्व रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार बंद

वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांची नाराजी

ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात व्यासपीठ उभारण्यात येत असून या कामामुळे पूर्व रेल्वे स्थानकात जाण्यासाठी उपलब्ध असलेला मार्ग बुधवारपासून मार्गरोधक लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घालून परिसरातील रेल्वे पुलामार्गे स्थानकात प्रवेश करावा लागला. या द्राविडी प्राणायाममुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे शुक्रवारी उद्घाटन केले जाणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांसह अनेक मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत.

या नेत्यांच्या उपस्थितीमुळे पोलिसांकडून रेल्वे स्थानकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या काही मीटर अंतरापासूनच नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना पूर्वेकडील तिकीट खिडकीवर पोहोचण्यासाठी सामानाचे ओझे घेऊन स्थानक परिसरातील रेल्वे पुलावरून आणि मुख्य प्रवेशद्वारापासून काही मीटर लांब असलेल्या चिंचोळय़ा भागातून रेल्वे स्थानकात प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button