breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजने पक्ष उभारायला शिकावे’; राज ठाकरेंचा टोला

मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी - राज ठाकरे

मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मार्गाच्या पुर्णत्वासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसंच त्यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. भाजपने दुसऱ्यांच्या आमदारांना निवडून फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, आज मी इथं मोठं भाषण करण्यासाठी नाहीतर ह्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय. चांद्रयान करून काय फायदा? तिथले खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय मतदारांना काहीच वाटत नाही?

भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. मी त्यांना सांगतो की त्या पेक्षा दुसऱ्यांच्या आमदारांना निवडून फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका, असा खोचक टोला राज ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६ कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीनजींना विनंती केली होती की जर राज्य सरकारला जमत नसेल तर तुम्ही घ्या तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का? मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत. जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Chandrayaan-३ : चंद्राभोवतीच्या प्रक्रिया पूर्ण, उद्या महत्वाचा टप्पा!

२०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे. गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री, असं राज ठाकरे म्हणाले.

३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं. पण तुम्ही काश्मीर असो, हिमाचल असो की नॉर्थ इस्टची राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button