विश्वविक्रम! ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार २१५ महिलांचे अथर्वशीर्ष पठण, इंग्लंडच्या ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स’मध्ये नोंद
३५,२१५ महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण: पुण्यातून जागतिक कीर्तीला गवसणी
पुणे: पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर दरवर्षी पार पडणाऱ्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा यंदाचा सोहळा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. ३५,२१५ महिला भगिनींनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष पठण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून, या विक्रमाची अधिकृत नोंद इंग्लंडमधील “ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स” मध्ये झाली आहे.
गणेशोत्सव काळात ऋषिपंचमीच्या दिवशी दरवर्षी हा भक्तिभावपूर्ण उपक्रम घेतला जातो. यंदा हा उपक्रम अधिक भव्य झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी सामूहिक स्वरूपात अथर्वशीर्ष पठण केल्याची ही पहिलीच वेळ ठरली.
या ऐतिहासिक क्षणाचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्सचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांना नुकतेच प्रदान केले.
श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टकडून मान्यवरांचा सत्कार
या वेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते. डॉ. दीपक हरके यांचा ट्रस्टतर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते बाप्पाची आरतीही करण्यात आली. डॉ. हरके यांनी या वेळी सर्व भक्तगणांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.





