कृष्णाकाठचा ढोल्या गणपती : दक्षिण काशी वाईतील अद्वितीय गणेशमूर्ती भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू
गणेशोत्सव विशेष : “वाईच्या कृष्णाकाठचा धार्मिक व सांस्कृतिक वैभव असलेला महागणपती”
वाई, जि. सातारा । विजयकुमार हरिश्चंद्रे : संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दक्षिण काशी वाई नगरीतील कृष्णाकाठचा ढोल्या गणपती म्हणजेच महागणपती हे भक्तांचे श्रद्धास्थान पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. शेकडो वर्षांपासून कृष्णेच्या काठावर विराजमान असलेली ही भव्य मूर्ती आजही नवसाला पावणारा देव मानली जाते.
गणेश घाटावरील हे भव्य मंदिर आणि त्यातील काळ्या पाषाणात कोरलेली बैठी महागणेशमूर्ती तिच्या अगडबंब रूपामुळे ‘ढोल्या गणपती’ या नावाने परिचित आहे. पुण्यापासून अवघ्या ७० किमी अंतरावर आणि साताऱ्यापासून सुमारे ५५ किमी अंतरावर असलेल्या वाई शहरातील हे मंदिर १७६२ मध्ये सरदार रास्ते यांच्याद्वारे उभारण्यात आले असून, मूर्ती केवळ एका दगडातून साकारण्यात आली आहे. स्थापनेचा इतिहास शके १६९१, वैशाख शुद्ध त्रयोदशीचा मानला जातो. या परिसरातील गणेश घाट, नदीकाठची मंदिरे, आणि सतत वाहणारी कृष्णामाई यामुळे संपूर्ण परिसर एक अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतो. प्राचीन स्थापत्यशैली आणि निसर्गसंपन्नता यांचा संगम असलेल्या या मंदिरात उन्हाळ्यातही आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळते.
ग्रामदैवत असलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक गर्दी करत असून, गणेशोत्सवाच्या काळात येथे विशेष गर्दी उसळते. “नवसाला पावणारा गणपती” अशी इथल्या भक्तांची दृढ श्रद्धा असून, अनेक भाविकांनी अनुभवलेल्या नवसपूर्तीच्या कथा स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या कुशीत, इतिहास, श्रद्धा, वास्तुकला आणि निसर्ग यांचं अनोखं रूप असलेलं हे गणपती मंदिर म्हणजेच कृष्णाकाठचा ढोल्या गणपती – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वैभवाचं एक देखणं प्रतीक ठरलं आहे.
महत्त्वाच्या बाबी :
स्थापना : शके १६९१, वैशाख शुद्ध १३
मूर्ती : काळ्या पाषाणातील एकदगडी, भव्य बैठक
मंदिर बांधणी : सरदार रास्ते, इ.स. १७६२
ठिकाण : वाई, जिल्हा सातारा (पुणे – ७० किमी, सातारा – ५५ किमी)
विशेष श्रद्धा : नवसाला पावणारा गणपती






