‘बारामतीला देशात क्रमांक एकवर नेणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : बारामतीकरांनी लाखाहून अधिक मताधिक्याने मला निवडून दिल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे गेल्या सात टर्मला झाली नाहीत एवढी विकासकामे आठव्या टर्ममध्ये करून बारामतीला देशात क्रमांक एकचे स्थान मिळवून देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती शहर-तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. खा. सुनेत्रा पवार, आ. अमोल मिटकरी, पार्थ पवार, दिगंबर दुर्गाडे, सुरेश पालवे, किरण गुजर, सचिन सातव, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, जय पाटील, अनिता गायकवाड, ज्योती लडकत, पुरुषोत्तम जगताप, केशवराव जगताप, सुनील पवार, पोपटराव गावडे, विक्रम भोसले आदी या वेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यासह बारामतीकरांनी लोकसभेला झटका दिल्याने माझ्यासह कार्यकर्ते सुद्धा चिंतेत होतो. परंतु, आम्ही ईव्हीएमला दोष न देता नव्या जोमाने कामाला लागलो. काही योजना आणल्या. मतदारांपुढे व्हीजन मांडले. त्यामुळे विधानसभेला महायुतीला न भूतो न भविष्यती यश मिळाले. त्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे.
हा निकाल महाविकास आघाडीला पचलेला नाही. त्यामुळे ते ईव्हीएमवर टीका करीत आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ईव्हीएमवर शंका घेणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून मविआ आंदोलन करीत आहे. काँग्रेस एकसंघ असताना आणि विरोधी पक्ष कमकुवत असताना राज्याच्या स्थापनेपासून आजवर असे यश मिळाले नव्हते.
हेही वाचा – डायमंड पार्क्सच्या ख्रिसमस चॅरिटी ड्राईव्हद्वारे प्रेमाचा प्रकाश पसरविण्याचा उपक्रम
यंदाही बारामतीकरांनी लाखाहून अधिक मताधिक्य दिल्याने आता जबाबदारी वाढली आहे. बारामतीच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मंत्रिमंडळात अर्थ आणि उत्पादन शुल्क अशी खाती मिळाली आहेत. त्याला योग्य न्याय देऊ. येत्या 3 मार्चला अर्थसंकल्प सादर करताना राज्याची आर्थिक शिस्त बिघडू न देता जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
तीन हत्ती चौकातील पाहणीबाबत त्यांनी नाव न घेता खा. सुळे यांना टोला लगावला. यापुढे विकासकामे करताना बुथ कमिट्यांना विचारूनच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीच्या विकासाचे व्हीजन त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. केंद्राकडून 3 कोटी घरांची योजना राबवली जाणार असून त्यातील 10 टक्के घरे राज्याला मिळावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र, राज्य, जिल्हा परिषद, नियोजन मंडळ आदींच्या माध्यमातून मोठा निधी आणून अनेक प्रकल्प मार्गी लावत पुढील पाच वर्षांत बारामतीला देशात क्रमांक एकचे स्थान मिळवून देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
बारामतीत मधल्या काळात मलिदा गँग असा शब्दप्रयोग करून नाव खराब करण्याचे काम झाले. आपल्यातील काही मंडळी स्वतः कामे घेतात आणि ती दुस-यांना विकतात. त्यांनी कृपा करून हे धंदे बंद करावेत. तुमच्यात धमक व ताकद असेल तरच कामे घ्या. पारदर्शकतेला प्राधान्य द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
महायुतीत आम्ही सहभागी असलो तरी पक्ष आपली विचारधारा सोडणार नाही. ध्येयधोरणे, विचारधारेशी प्रतारणा करणार नाही. उलट सहभागी पक्षांनाही महापुरुषांच्या विचारधारेने काम करायला लावू असे अजित पवार म्हणाले.





