पुणे पोलिसांकडून ई-साक्ष ॲपचा वापर

पुणे : गंभीर गुन्ह्यांचा तपासासाठी पुणे पोलिसांकडून आता ई-साक्ष उपाययोजनाचा (ॲप) वापरण्यात येणार आहे. या ॲपच्या वापराबाबत पुणे पोलीस दलातील अडीच हजार पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात या ॲपचा वापर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
भारतीय न्याय संहितेनुसार ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी ई-साक्ष ॲप वापर करणे बंधनकारक आहे. या ॲपचा वापर केल्यास तपासात पारदर्शकता येईल तसेच, न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यास मदत होईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा – प्रवाशी वाहन चालविताना इलेक्ट्रॉनिक उपरणे वापरल्यास महागात पडणार, परिवहन विभागाकडून लवकरच आदर्श कार्यपद्धती
नवीन कायद्याच्या प्रभावी अंमबजावणीसाठी या ॲपचा वापर कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ई-साक्षॲपद्वारे साक्ष नोंदणी, घटनास्थळाचा पंचनामा, तपास अधिकाऱ्यांची ओळख, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांची घटनास्थळी भेट, ध्वनी चित्रफीत या बाबी नोंदवून घेतल्या जाणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
याविषयी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दाखल झालेल्या ७०२ गुन्ह्यांच्या कामकाज तसेच तपासात ई-साक्ष ॲपचा वापर करण्यात आला आहे. या ॲपच्या वापरामुळे तपासाची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. तपासाची गुणवत्ताही सुधारेल, तसेच या ॲपचा प्रभावी वापर केल्यास न्यायालयात गुन्हे सिद्ध हाेण्यास मदत होईल.