ऐन पाडव्याच्या सिझनमध्येच एचएसआरपी प्लेट बसविणे बंद

पुणे : गुढीपाडव्याला नवीन वाहन खरेदीसाठी शहरातील सर्वच शोरूममध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे काही शोरूम चालकांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंद केले आहे. काही शोरूम चालकांनी तर तसे फलकच शोरूमसमोर लावले आहेत. त्यामुळे या चार ते पाच दिवसांमध्ये एचएसआरपी प्लेट बसविण्याच्या तारखा दिलेल्या नागरिकांना विनाकारण फेऱ्या माराव्या लागत आहेत.
परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी असलेल्या वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट ३० जूनपर्यंत बसविणे अनिवार्य केले आहे. वाहनांची संख्या आणि त्या तुलनेत सुरू असलेले काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसते. ढिसाळ नियोजनामुळे हजारो नागरिकांना आपल्या वाहनांना नंबर प्लेट लावण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा – पुणे पोलिसांकडून ई-साक्ष ॲपचा वापर
कधी नंबर प्लेट नोंदणीसाठी वेबसाईट बंद होणे, फिटमेंट सेंटर अचानक बंद करणे, नागरिकांनी नोंदणी केली तरी वेळेवर नंबरप्लेट न येणे अशा तक्रारींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नोंदणी वाढली तरी त्या प्रमाणात केंद्र नसल्यामुळे नागरिकांना एक ते दोन महिन्याच्या पुढील तारखा मिळू लागल्या आहेत.
आता नागरिकांसमोर आणखी नवीनच समस्या उभी राहिली आहे. शहरात अनेक शोरूममध्ये सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याचे काम सुरू आहे. त्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे सुरक्षा नंबरप्लेट बसविणे बंद केल्याचे काही शोरूम चालकांकडून सांगण्यात आले. तर काही शोरूम चालकांनी तसे फलकच लावले आहेत. त्यामुळे नंबर प्लेट बसविण्यासाठी तारीख मिळालेल्यांनी काय करायचे असा प्रश्न आहे.