
चाकण : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ने सुमारे वीस किलोमीटर अंतरापर्यंत पंधरा ते वीस वाहनांना धडक दिली. या धडकेत पोलिसव्हॅन चाही समावेश आहे. अपघाताची सुरुवात चाकण जवळील माणिक चौकात तीन महिलांना धडक देऊन झाली होती. जातेगाव फाटा ( तालुका शिरूर ) गावा नजिक हायवा ( मोठा ट्रक ) आडवा लावून कंटेनर थांबवण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की चाकण शिक्रापूर रस्त्यावर दुपारी एक ते दोन च्या दरम्यान कंटेनर चालला होता तीन महिलांना धडक दिली. अपघातानंतर कंटेनर
पळून जात आहे, असे निदर्शनास आल्यानंतर अनेक दुचाकी व खाजगी वाहनांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. तरीदेखील कंटेनर वेगात पुढे जातच होता, कंटेनरला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व समोरून येणाऱ्या 15 ते 20 खाजगी वाहनांना कंटेनर ने धडक देऊन नुकसान केले . शेळपिंपळगाव जवळ कंटेनर ने मागे वळून पुन्हा चाकणच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र समोरून येणारी असंख्य वाहने पाहून कंटेनर पुन्हा वळून शिक्रापूरच्या दिशेने गेला. स्थानिक नागरिकांनी व रस्त्यावरील अनेकांनी कंटेनर थांबविण्यासाठी दगडफेक केली मात्र कंटेनर न थांबता पुढे जातच होता. बहुळ गावानजीक पोलिसांनी आडवे लावलेले बॅरिकेट उडवून कंटेनर पुढे गेला जातेगाव फाटा ( तालुका शिरूर ) येथे हायवा गाडीचालकाने अथक प्रयत्न करून कंटेनर ला रस्त्याच्या खाली ढकलले, त्याचवेळी कंटेनर बंद पडल्याने थांबला .
कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या संतप्त जमावाने कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांची कमुक वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस व्हॅन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास मोरमारे व वार्डन अभिजित कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत.तर चाकण नजीक माणिक चौकात दुसऱ्या वाहनाची प्रतीक्षा करणाऱ्या पोर्णिमा अंबादास गाढवे ( वय २५ भोसरी) धनश्री अंबादास गाढवे ( वय ७ ) तसेच ज्योती प्रवीण ढोले ( वय ३१, रा. बालाजी नगर चाकण या महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकीब अब्दुल रजाक खान ( वय २५ रा. पलवल, हरियाणा ) या मद्यधुंद कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी पुण्याला रवाना केले आहे.