‘मित्र पक्षाकडून सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात मिळत नाही’; रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत

कामशेत : मित्र पक्षाकडून कायमच रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाते आणि सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात दिला जात नाही. अशा परिस्थितीत आपली स्वबळावर लढण्याची तयारी असायला हवी, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. कामशेत येथे आयोजित पक्षाच्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरात ते बोलत होते.
पुढे बोलताना आठवले यांनी, फक्त बौद्ध समाजच नाही तर सर्वच समाजातील लोकांशी सलोख्याचे संबंध असायला हवे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणे ही कायमच आपल्या पक्षाची भूमिका आहे. तसेच पक्ष बांधणीत सर्वांनी आपली योग्य भूमिका बजावली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून बहुसंख्य कार्यकर्ते या अभ्यास शिबिराच्या निमित्ताने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीसह उद्योग व्यवसाय, समाजकारण याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग-व्यवसाय बाबत संतोष कांबळे यांनी, तर पक्ष बांधणी बाबत विजय खरे यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा – यूपीआयद्वारे मोठ्या व्यवहारांना मंजुरी; आरबीआयचा मोठा निर्णय
शिबिरात अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ सरवते हे होते. तसेच याप्रसंगी अविनाश महातेकर, आण्णा वायदंडे, पप्पू कागदे, परशुराम वाडेकर, श्रीकांत कदम, शरण कुमार लिंबाळे आदी मान्यवर व तालुक्यातील अंकुश सोनवणे, रूपेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक बाबुराव कदम यांनी केले. आभार अशोकबापू गायकवाड आणि तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.