यूपीआयद्वारे मोठ्या व्यवहारांना मंजुरी; आरबीआयचा मोठा निर्णय

UPI Payment | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ला यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)द्वारे पर्सन-टू-मर्चंट (पीटूएम) व्यवहारांच्या मर्यादेत वाढ करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे यूपीआयद्वारे मोठ्या रकमेचे व्यवहार करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे डिजिटल पेमेंटला मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे.
सध्या यूपीआयद्वारे शेअर बाजार, विमा यासारख्या व्यवहारांसाठी ग्राहकांना 2 लाख रुपयांची मर्यादा आहे, तर कर भरणा, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि आयपीओ पेमेंटसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. एनपीसीआयचा यूपीआय व्यवहारांच्या मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव आरबीआयने मान्य केला आहे. मात्र, पर्सन-टू-पर्सन (पीटूपी) व्यवहारांसाठी यूपीआयद्वारे पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपये कायम ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा : Tahawwur Rana | तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण; एनआयएला १८ दिवसांची कोठडी
हा निर्णय व्यापारी आणि छोट्या दुकानदारांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. यामुळे त्यांना मोठ्या रकमेचे व्यवहार यूपीआयद्वारे सहजपणे करता येतील. याचा परिणाम म्हणून डिजिटल पेमेंटच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, तर रोखीच्या व्यवहारांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि ग्राहकांसह व्यापाऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. एनपीसीआय आता बँका आणि इतर भागधारकांशी चर्चा करून नव्या मर्यादांबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.