रेशन दुकानदारांचे आंदोलन स्थगित पुरवठा विभागाच्या आश्वासनानंतर घेतली माघार

पुणे : रेशन दुकानदारांनी दि. १ नोव्हेंबरपासून धान्यवाटप बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मार्जिनमनीच्या प्रश्नावरून रेशनदुकानदारांनी संपाचा इशारा दिला होता.दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनेच्या वतीने १ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व ५६ हजार २०० रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद, धान्यवाटप बंद, दुकान बंद आंदोलन पुकारले होते.
हेही वाचा – सोलापूर दक्षिणच्या जागेवरून ‘मविआ’त बिघाडी? संजय राऊत-नाना पटोले यांच्यात पुन्हा खडाजंगी!
याबाबत मुंबई येथे मंत्रालयात अन्य व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी महासंघाचे राज्य अध्यक्ष डी. एन. पाटील व फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपत डोळसे, तसेच दोन्ही संघटनांबरोबर नुकतीच बैठक घेतली.
या वेळी दुकानदारांचे कमिशन वाढविणे व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. नवीन येणाऱ्या मंत्रिमंडळासोबत याबाबत एकत्रित बैठक आयोजित करून हे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे देओल यांनी या वेळी आश्वासित केले. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.





