‘अमेरिकेशी व्यापारासाठी नव्हे, तर अदानींसाठीचा सौदा’; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Rahul Gandhi | भारतीय उद्योजक आणि अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल झालेले लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बातमीनंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांनी अमेरिकेसोबत केलेला करार हा व्यापार वाढवण्यासाठी नसून, अदानींना कायदेशीर कचाट्यातून सोडवण्यासाठी केलेली ‘डील’ आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण वृत्तानुसार, अमेरिकेचा न्याय विभाग गौतम अदानी यांच्यावरील फसवणुकीचे आरोप मागे घेण्याच्या तयारीत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकी सरकारी वकिलांनी अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर सहा जणांविरुद्ध लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप निश्चित केले होते. अमेरिकी करदात्यांचा पैसा वापरून हा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर ठपका होता. मात्र, अमेरिकेत ट्रम्प प्रशासन सत्तेवर आल्यानंतर बदललेल्या धोरणांमुळे आता हे खटले मागे घेतले जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
हेही वाचा
उन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सिंह सेनगरच्या जामिनाला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक
याच आंतरराष्ट्रीय घडामोडीचा आधार घेत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या पंतप्रधानांनी कोणताही व्यापार करार केला नसून, अदानींच्या सुटकेसाठी सौदा केला आहे.”
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, हा खटला मागे घेणे हा अदानींना दिलेला कोणताही वैयक्तिक राजकीय फायदा नाही. त्याऐवाजी, ट्रम्प प्रशासनाचे परकीय लाचखोरीच्या प्रकरणांमधून माघार घेण्याचे आणि जागतिक पातळीवर ‘ग्लोबल कॉर्पोरेट पोलीस’ म्हणून काम न करण्याचे जे व्यापक धोरण आहे, त्याचाच हा एक भाग असू शकतो. मात्र, जरी अमेरिकेच्या न्याय विभागाने हे फौजदारी खटले मागे घेतले, तरी गौतम अदानी यांना मोठा आर्थिक दंड भरावा लागण्याची शक्यता अद्याप कायम आहे.





