‘मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती’; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांची टीका

Ajit Pawar | विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या २९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस असल्यामुळे आज राज्यातील अनेक दिग्गज नेते आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे बारामतीत काकाआणि पुतण्यात लढत होणार आहे. यासंदर्भातच बोलताना अजित पवारांनी बारामतीत एक मोठं विधान केलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
लोकशाहीत निवडणुकीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात जेव्हा-जेव्हा जे उमेदवार उभे राहिले, ते सर्वच उमेदवार स्ट्रॉंग आहेत असं समजूनच माझ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि माझ्या कुटुंबाने नेहमीच प्रचार केला. आता या निवडणुकीत देखील बारामतीकर चांगल्या मताधिक्यांनी मला निवडून देतील असा मला विश्वास आहे. त्यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याबाबत जास्त काही बोलणार नाही. मात्र, त्यांनी (शरद पवार) असं करायला नको होतं. लोकसभेच्या निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, ती माझी चूक होती. पण तीच चूक पुन्हा त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती, पण चूक केली आहे. आता मतदार यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – सोलापूर दक्षिणच्या जागेवरून ‘मविआ’त बिघाडी? संजय राऊत-नाना पटोले यांच्यात पुन्हा खडाजंगी!
दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका-पुतण्या आमने-सामने आहेत. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.





