रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रासायनमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पर्यावरण आणि आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडत प्रदूषण रोखण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे, असा सवाल केला. रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या, कोणत्याही उद्योगाला प्रक्रिया न करता थेट रासायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडण्याची मुभा दिली जाणार नाही. अशा उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, कोणत्याही विशिष्ट प्रकरणाची तक्रार आल्यास तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. नद्यांमधील वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय भूमिका बजावणार, तसेच दोषी उद्योगांवर कारवाई कधी केली जाणार, यावर आमदार जगताप यांनी सरकारला जाब विचारला. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी कठोर भूमिका घेत पर्यावरण रक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगितले.
हेही वाचा – तीन वर्षांत ६ कोटी प्रवाशांची मेट्रो सफर
नद्यांच्या शुद्धतेसाठी मैला जलशुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करण्याची गरज असून, महानगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींनी जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सूचित केले. नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या कंपन्या आणि व्यवसायांवर लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले.