माणुसकीला काळिमा फासण्यासारखे कृत्य, नीरा उजवा कालव्यामध्ये तीन हजार मृत कोंबड्या
संबंधितावर कार्यवाही करावी : रामराजे नाईक निंबाळकर

दुधेबावी : फलटणसह माळशिरस तालुक्यातून जात असलेल्या नीरा उजवा कालव्यामध्ये दोन ते तीन हजार मृत कोंबड्या टाकल्या असल्याचा प्रकार समोर आला. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे व्हिडिओ व्हायरल करत संताप व्यक्त केला. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या प्रार्थनेवर हा व्हिडिओ स्टेट्सला टाकला आहे.
हेही वाचा – कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
रामराजे यांनी ठेवलेल्या स्टेट्समध्ये लिहिले आहे, की किती स्वार्थी कृती आहे ही, या कालव्यावरती कितीतरी माणसे जनावरे पाणी पितात आणि याच पाण्यात मृत कोंबड्या टाकून कितीतरी लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न कोणीतरी केला आहे. त्याला थोडीशीही जाणीव नाही की तो हे कृत्य करून कितीतरी जणांच्या जिवांचे नुकसान करतोय. असे कृत्य करणे म्हणजे माणुसकीला काळिमा फासण्यासारखे आहे. केलेले कृत्य चुकीचे असून, असे कृत्य यापुढे कोणी करू नये, संबंधितावर कार्यवाही करावी, अशी मागणी रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.