तीन वर्षांत ६ कोटी प्रवाशांची मेट्रो सफर

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उभारण्यात आलेली मेट्रो सेवा पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे. मेट्रो सेवा सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली असून, आतापर्यंत तब्बल ५ कोटी ९८ लाख ७६ हजार ७४३ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे.त्यापोटी केवळ तिकिट विक्रीतून महामेट्रोला तब्बल ९३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असून, दैनंदिन प्रवासी संख्या तब्बल १ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे.
६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज हे मार्ग सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मेट्रोचा गेल्या तीन वर्षांत विस्तार झाला असून, सध्या शहरात ३३.२८ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे संचालन सुरू आहे.
हेही वाचा – महापालिकेच्या वतीने रानजाई महोत्सव आणि भव्य फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन
दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून, यामध्ये पीसीएमसी- निगडी, स्वारगेट- कात्रज, तसेच वनाज- चांदणी चौक, रामवाडी- वाघोली, खडकवासला- खराडी, हडपसर- लोणी- काळभोर यांसारख्या नवीन मार्गिकांचा समावेश आहे. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महामेट्रोला आणखी गती येणार असून, शहरात नोकरी- व्यवसायानिमित्त नियमित प्रवास करणाऱ्यांचे जगणे आणखी सुखकर होणार आहे.
मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मार्च २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान पुणे मेट्रोने २१.४७ लाख प्रवासी वाहतूक केली होती. मात्र, विस्ताराच्या वेगवान टप्प्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढली. फक्त २०२३-२४ मध्येच १.६९ कोटी प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. गणेश चतुर्थीच्या दिवशी (१७ सप्टेंबर २०२४) विक्रमी ३.४६ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६० हजारांच्या वर गेली असून, त्यात प्रत्येक महिन्याला तीन ते चार हजारांनी प्रवासी वाढत असल्याचे चित्र आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शहराच्या वाहतुकीत मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावत आहे सुरक्षित, वेगवान, पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह प्रवास देण्यात पुणे मेट्रो यशस्वी ठरली आहे. आगामी विस्तार प्रकल्पांमुळे शहराचा मोठा भाग मेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार असून, त्यालाही प्रवासी असाच प्रतिसाद देतील.
– श्रावण हार्डिकर, महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक