मंचरमधील आंदोलनाचा फटका, वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..
पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प
पुणे : पिंपरखेड येथे रोहन विलास बोंबे या १३ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा बिबट्याने केलेला हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुणे- नाशिक महामार्गावरील तांबडेमळा- भोरवाडी (ता. आंबेगाव) येथील नंदी चौकात सोमवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन दोन्ही बाजूला सुमारे चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनामुळे पुणे- नाशिक महामार्ग प्रथमच १० तासांहून अधिक काळ ठप्प झाला होता. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. राज्य परिवहन महामंडळाने या महामार्गावरील जाणाऱ्या एसटी बस अन्य मार्गावरून वळविल्या. मोटार व छोट्या वाहन चालकांनी पुण्याकडे जाण्यासाठी नारायणगाववरून अष्टविनायक महामार्गाने पारगाव- रोडेवाडी फाटा, लोणी, पाबळ, शिक्रापूरमार्गे पुणे; तर काहींनी अवसरी फाट्यावरून अवसरी, गावडेवाडी, जऊळकेमार्गे राजगुरुनगर, तर काहींनी अवसरी वारसुळामळामार्गे पेठ घाट या पर्यायी मार्गाचा वापर केला.
हेही वाचा : शाळा पुन्हा गजबजल्या! दिवाळी सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू
नाशिककडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पेठ, कुरवंडी, घोडेगाव, मंचर; तर काहींनी पेठ, पारगाव जऊळकेमार्गे गावडेवाडी- अवसरी- मंचर या मार्गाचा वापर केला. मालवाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच अडकून पडली, तर नाशिक, धुळे, गुजरातकडे जाणारी वाहने रस्त्यातच अडकून पडल्याने चार किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना आंदोलनकर्ते रस्ता मोकळा करून देत होते.
अचानकच्या आंदोलनाचा फटका
रविवारी रात्रीत अचानकपणे निर्णय घेऊन झालेल्या या आंदोलनाने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. पर्यायी रस्त्यांवर देखील लहान रस्ते असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, बेल्हे- जेजुरी महामार्ग व रांजणगाव- ओझर अष्टविनायक महामार्ग एकत्र येत असलेल्या रोडे फाटा (पोंदेवाडी) या ठिकाणीही रविवारी रात्री आठ वाजल्यापासून मध्यरात्री दीड वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले होते.



