शिवजयंती मिरवणुकीत अश्लील गाण्यांचा गोंधळ – शिवभक्त संतप्त
शिवजयंती उत्सवात तळेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका

तळेगाव: शिवजयंतीच्या उत्साहात तळेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघत आहेत. मात्र, या उत्सवाच्या पवित्रतेला गालबोट लागण्याची घटना समोर येत आहे. मिरवणुकांमध्ये अत्यंत अश्लील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी कोणताही संबंध नसलेली गाणी मोठ्या आवाजात वाजवली जात आहेत. या प्रकाराने शिवप्रेमी आणि अभिमानी नागरिक संतप्त झाले आहेत.
“शिवजयंती हा महाराजांच्या विचारांचा उत्सव आहे, गोंगाटाचा नाही. ‘तुम तो धोकेबाज हो’ किंवा ‘चोरीचा मामला’ अशी गाणी वाजवून शिवजयंती साजरी करणं हास्यास्पद आणि लाजीरवाणं आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
हेही वाचा : ..म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
शहरभर विविध भागांमध्ये मिरवणुका निघत असून, स्पीकरच्या मोठ्या भिंती उभारून लेझर लाइट्ससह बेताल गाणी लावली जात असल्याची तक्रारी मिळत आहेत. “आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मात्र अशा प्रकारांवर कारवाई होत नाही,” अशी खंत शिवभक्तांनी बोलून दाखवली.
पोलिस प्रशासनाने या गोंधळावर आळा घालावा आणि अश्लील गाणी वाजवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शिवभक्तांनी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मिरवणुकांमध्ये पोवाडे, अभंग आणि पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.
“महाराज, आम्हाला माफ करा! आम्ही फक्त गोंगाट करणारे उत्सवप्रेमी झालो आहोत, तुमचे विचार पाळणारे नाही” – शिवभक्तांची खंत