पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे पुणेकरांची कोंडी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडली. पंतप्रधानांच्या पुणे आगमनानिमित्त पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आल्याने मध्य भागात वाहतूक कोंडी झाली होती. तर मंगळवारी प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी दुपारपासूनच रस्ते बंद केले गेल्याने तसेच रस्त्याकडेला वाहने उभी करण्यास बंदी केल्याने गल्ली बोळातील रस्ते जाम झाले होते. सोलापूर रस्ता, सातारा रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पंतप्रधान मोदी यांच्या आगमनानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या रस्त्यांना जोडणारे उपरस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणारे नागरिक कोंडीत अडकले होती. तीच स्थिती मंगळवारीही होती. यामुळे पुणेकरांना सलग दोन दिवस मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.
हेही वाचा –भोसरीत ‘आ रहे भगवाधारी’ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा!
जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती, तसेच टिळक रस्ता, सदाशिव पेठ, शास्त्री रस्ता परिसरात कोंडी झाली. ऐन कार्यालय सुटण्याच्या वेळीच मोदींची सभा असल्याने त्यातच मध्यवर्ती भागातील रस्ते बंद केल्याने आजूबाजूच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. एस.पी.महाविद्यालय परिसराला छावणीचे रूप आले होते. कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले होते. सभा संपल्यानंतरही वाहनचालक तसेच पीएमपी मधील प्रवासी तासभर मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीत अडकून पडले होते.





