जिंकणार तर होतोच, उगीच टेन्शन दिलं राव!

कोणत्याही स्पर्धेत भारताचा संघ अपराजित असतो, तेव्हा अंतिम सामन्यात हमखासपणे हरायचे ही आपली जुनी खोड! प्रेशर म्हणा, टेंम्परामेंट म्हणा पण ‘लोचा’ हा ठरलेलाच ! अंतिम सामन्यासाठी जल्लोषाची तयारी करा, पण पदरी निराशाही ठरलेलीच! थोडक्यात काय भारताची ती खासियतच!
थोडसं इतिहासात डोकवा..
हे उगीच नाही म्हणत..2003 किंवा 2023 चे वर्ल्डकप आणि इतर अनेक फायनल्स बघा.. त्यात यावेळेस समोर न्यूझीलंड ! स्टार खेळाडूंचा भरणा नसलेला पण, मोक्याच्या वेळेस प्रत्येक जण आपला खेळ उंचावणारा असा पक्का व्यावसायिक संघ आहे न्यूझीलंडचा ! आयसीसी टूर्नामेंटमधले त्यांचे आपल्याविरुद्धचे रेकॉर्ड पण जबरदस्तच ! त्यामुळेच रविवारच्या ‘चॅम्पियन ट्रॉफी’ च्या फायनलमध्ये प्रचंड धाकधूक मनात ! त्यात प्रसारमाध्यमे ताप वाढवायचं काम इमाने, इतबारे करीत होतीच..यावेळी रिस्क नको म्हणून कित्येक ‘श्रद्धाळूं’नी अतिशय लो प्रोफाईल ठेवत घरीच मॅच पाहणे पसंत केले, हे पण महत्त्वाचे !
रोहित शर्मा आणि नाणेफेक..
रोहित शर्मा आणि नाणेफेक यांचे नाते म्हणजे पाकिस्तान आणि शांतता एवढे सरळ आहे. रोहित शर्मा आणि त्याच्या नशीबाच डील झालं असावं..’तुला मॅच जिंकून देतो पण नाणेफेक नाही’..ओळीनं पंधरा टॉस हरणे ही काय सोपी गोष्ट आहे ! गमतीने आता प्रेक्षकही बोलू लागले आहेत.. ते शोले मधलं नाणं तर नाही ना ?
सगळं कसं ठरल्याप्रमाणं !
अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंडने फलंदाजी घेतली.. अंतिम सामन्याचे प्रेशर, दुसर्या डावात ऐन वेळी फिरण्याची खेळपट्टीची सवय आणि दंव पडण्याचा मुद्दा तिथे नसल्याने तो निर्णय स्वाभाविक होता. रचिन रवींद्रची क्षमता आणि सध्याचा त्याचा फॉर्म बघता तो सामना कधीपण फिरवू शकतो. पण, कुलदीपनं त्याचा आणि सदाबहार केन विल्यमसनचा अडथळा दूर केला, आणि मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचण्याची स्वप्ने धुळीस मिळवली.
पाहिजे तशी खेळपट्टी..
खरं तर आजची खेळपट्टी आधीच्या सामन्यांच्या तुलनेत थोडी सोपी होती. फिरक पण कमी मिळत होती. पण, अक्षर, जडेजा, कुलदीप आणि भन्नाट वरूण यांनी ‘विकेट टू विकेट’ टिच्चून गोलंदाजी केली, धावा रोखल्या आणि न्यूझीलंडला वेळोवेळी धोके घ्यायला भाग पाडले. भारतीय फिरकीने टप्प्याटप्प्याने विकेट घेत रनरेट कमी ठेवला.
मिशेल आणि भारतीय गोलंदाजी यांच काय आपसी प्रेम आहे माहीत नाही, पण गडी खेळतोच! धोकादायक फिलिप्स शुभमनने एक दान देऊन पण विशेष काही करू शकला नाही. ती उणीव भरून काढली ब्रेसवेलनं ! शामीच्या शॉर्ट ऑफ लेंथ बोलिंग ला त्याने आस्मान दाखवले. ते पुल शॉट्स बघून रोहित पण खुश झाला असेल, एवढा तो फटका नयनरम्य होता!
रोहितच्या नेतृत्वाची कमाल..
न्यूझीलंडच्या संपूर्ण डावात रोहितची कॅप्टन्सीची कमाल होती. त्याचे बोलिंग चेंजेस, स्ट्रॅटेजी आणि फिल्ड प्लेसमेंट कमाल होती. कुठेही हाराकिरी नाही, एक दोन फटके बसले म्हणून शाळकरी कॅप्टनसारखे धावत गोलंदाजाकडे जाणे नाही. शांतपणे सगळा कार्यक्रम करणे एवढेच ध्येय! त्याने वरूण चक्रवर्तीला संपूर्ण स्पर्धेत कमालपणे वापरले. तरीही अपेक्षेपेक्षा न्यूझीलंडने वीस एक धावा अधिक केल्या, हे पण लक्षात घ्यायला हवे !
हेही वाचा – उष्माघाताच्या धोक्यात वाढ! राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना सुरु
‘टार्गेट’ मोठे नव्हते !
दोनशे बावन्न हे टार्गेट खूप अवघड, मोठे नव्हते. पण, खेळपट्टीचे स्वरूप, न्यूझीलंडची गोलंदाजी ( हेन्रीशिवाय सुद्धा), क्षेत्ररक्षण आणि अंतिम सामन्याचा दबाव पाहता खूप परिपक्व आणि शिस्तबद्ध बॅटिंगची आवश्यकता होती. रोहितची आजची इनिंग त्याचे एक उत्तम उदाहरण होते. सुंदर फिरकी गोलंदाजांप्रमाणे फलंदाजही जबाबदारीने खेळताना दिसले.
खरे तर सुरूवातीलाच रोहित शर्माने धोके पत्करून ‘पिंच हिटर’ बनून तीस चाळीस रन्स काढून जायचे, ही कोणाच्या डोक्यातील सुपीक योजना आहे देव जाणे !आज तो तसा खेळला नाही, हे आपले सुदैव! त्याच्यात गुणवत्ता एवढी भरलीय, की आरामात खेळला तरी शंभरच्या आसपास स्ट्राईक रेट असतोच. प्रत्येक वेळेस विराट ‘संकटमोचक’ ठरेल ही अपेक्षाच चुकीची ठरली. त्यानेच प्रत्येक वेळी संघाला पराभवाच्या खाईतून वर काढायचे, ते किती दिवस चालायचे!
फिलिप्सचा अफलातून कॅच..
रोहितमुळे शुभमनला वेळ घेता आला. तो सेट झाल्यानंतर लयीत आला आणि एका अफलातून कॅचने त्याचा डाव संपवला. एरवी, लयबद्ध टाकणाऱ्या सँटनरने एक ‘फ्लाईटेड स्लोअरवन’ टाकला. शुभमननं पूर्ण ताकतीनं बॉल मैदानाबाहेर टाकण्यासाठी ‘फूल ब्लडेड ऑफ ड्राईव्ह’ मारला आणि पुढं जे झालं ते निव्वळ अविश्वसनीय होतं. पण, एक क्रिकेट रसिक म्हणून डोळ्यांना प्रचंड सुखावह होत! फिलिप्सनं यास्पर्धेत अनेक अफलातून कॅचेस घेतलेत, पण तू कॅश मात्र सर्वोत्तम ठरावा, असाच होता. रिअल टाईममध्ये सेकंदाच्या फ्रॅक्शन मध्ये तो ॲन्टीसिपेट करणे, जम्पिंग टाईम करणे आणि थोडेसे मागे जाऊन तो कॅच पकडणे..वा मजा आली..सर्व गोष्टीच अविश्वसनीय म्हणाव्या लागतील.
भारताचा सर्वोत्तम संघ..
त्यानंतर आलेल्या विराटनं थोडा अपेक्षाभंगच केला. ब्रेसवेलच्या पहिल्याच बॉलला ॲक्रॉस खेळताना फसला आणि सगळ्या देशाचा श्वास थांबला, नंतर धावांचा ओघ आटला आणि वाढवताना रोहित फसला! त्यानंतर अक्षर पटेल, राहूल, पांड्याआणि शेवटी जडेजा !प्रत्येकाने बाजू सांभाळत नय्या पार केली आणि अजून एका ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ चे अजिंक्यपद पटकावूनच रोहितचा चमू भारतात परतला. भारताचा संपूर्ण संघच यावेळी चांगलाच बहरात आहे. कोणताही बलाढ्य संघ यापुढे टिकू शकत नाही, एवढा मोठा विश्वास रोहितच्या संघाने मिळवला आहे, हे नक्की !