भोसरीत ‘आ रहे भगवाधारी’ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा!
पिंपरी-चिंचवडमधील महायुतीच्या उमेदवारांचा करणार प्रचार : रविवारी, दि.१७ नोव्हेंबर रोजी प्रखर हिंदूत्त्वाची तोफ धडाडणार

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आठवडाभरामध्ये मातब्बर नेत्यांच्या सभांचे नियोजन आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रखर हिंदुत्त्ववादी नेता अशी ओळख असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, चिंचवडमधील शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदान येथे रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तर भारतातील नागरिकांची संख्या निर्णायक आहे. त्यातच योगी यांना मानणाऱ्या अमराठी लोकांमध्ये त्यांची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे भोसरीतील सभा विक्रमी होईल. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून, महाविकास आघाडीला आव्हान देण्याची तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे, सुमारे १ लाख पिंपरी-चिंचवडकर उपस्थित राहतील. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून नागरिक येतील, असा दावा केला जात आहे.
व्होट जिहाद विरुद्ध भगवा जिहाद…
दरम्यान, शहरातील काही मुस्लिम संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘भगवा जिहाद’ असा नारा हिंदूत्त्ववादी नेत्यांकडून दिला जात आहे. जाती-जातींमध्ये विभागलेल्या हिंदू समाजाने एकजूट करुन राष्ट्रधर्माचे कार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात ‘बटोगे नहीं तो कटोगे नहीं’ असा नारा देण्यात येत आहे.