रमाईंचा त्यागच बाबासाहेबांच्या कार्यामागची खरी शक्ती; केंद्रीय मंत्री रामदास आठवले
ऐतिहासिक क्षण : त्यागमूर्ती रमाई आंबेडकर सृष्टीचे पिंपरीत भूमिपूजन

पिंपरी-चिंवचड | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या कार्यामागे त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचा त्याग, समर्पण आणि खंबीर साथ हीच खरी ताकद होती, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी येथे केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) परिसरात उभारण्यात येणाऱ्या “त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी”चे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बाबासाहेबांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर, महापौर रवि लांडगे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आठवले यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी देशाला संविधान, समानता आणि स्वाभिमान दिला; मात्र त्या कार्याला बळ देणारी शांत, त्यागी शक्ती रमाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी उभी होती. “रमाई नसत्या तर बाबासाहेबांचे महान कार्य अधिक कठीण झाले असते,” असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत शिक्षण, न्याय आणि मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याला आदरांजली वाहिली.
हेही वाचा
जुन्नरमध्ये हृदयद्रावक घटना; शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन हे पिंपरीसाठी गौरवाची बाब असल्याचे सांगत शहरात भीमसृष्टीसह महापुरुषांची उभारलेली स्मारके सामाजिक परिवर्तनाचा वारसा जपत असल्याचे मत व्यक्त केले.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, या स्मारकासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल १५ वर्षे संघर्ष केला असून अखेर २७ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. रमाईंच्या जीवनातील संघर्ष आणि त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्या गीतगायनाने वातावरण भारावून गेले. बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमातून रमाईंच्या त्यागाचे स्मरण करत सामाजिक न्याय, समानता आणि परिवर्तनाच्या विचारांना पुन्हा अधोरेखित करण्यात आले.
“समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही केवळ कल्पना नसून ती समाजपरिवर्तनाची खरी पायाभरणी आहे. शिक्षणाशिवाय स्वाभिमान आणि न्याय यांची जाणीव होऊ शकत नाही.”
– डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेबांचे नातू.
“बाबासाहेबांचा विचार म्हणजे अन्यायाविरुद्धचा अखंड संघर्ष आहे. रमाईंच्या त्यागामुळेच हा संघर्ष यशाच्या शिखरावर पोहोचला आणि आजचा समाज आत्मविश्वासाने उभा आहे.”
– रामदास आठवले, केंद्रीय मंत्री.





