पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक; पिस्तुल कारखाना उद्ध्वस्त , 47 जणांच्या आवळल्या मुसक्या

पुणे : पुणे पोलिसांनी महाराष्ट्राबाहेर जात मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील उमर्थी गावात मोठी कारवाई करत पिस्तूल बनवणारे कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. अनेक अल्पवयीन मुलांकडे बेकायदेशीर हत्यारं आणि बंदुका आढळून आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांना या शस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेशातून होत असल्याचे धागेदोरो पुणे पोलिसांच्या हाती लागले. या माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून मध्य प्रदेश गाठले
ही कारवाई पुणे शहर पोलिसांचे उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राबवली गेली. एकूण १०५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पथक या विशेष ऑपरेशनमध्ये सहभागी होता. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी उमर्ती परिसरात एकाचवेळी छापे घालत पुरावे आणि यंत्रसामग्री जप्त केली.
हेही वाचा – २४ नोव्हेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ नवीन स्थानकावर थांबणार… बारामती, फलटण, करमाळा प्रवास सुलभ
धाडीत पिस्तूल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार स्वतंत्र फॅक्टऱ्या आढळून आल्या. या युनिट्समध्ये शस्त्रांची बेकायदेशीर निर्मिती, दुरुस्ती आणि पुरवठा सुरू असल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा उध्वस्त करत कारखान्यांमध्ये आढळलेले सर्व साहित्य सील केले.कारवाईत १०० पेक्षा अधिक बॅरल, ५ मॅगझिन, १४ ग्राइंडिंग मशीन, २ पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय इतर महत्त्वाचे साचे, औजारे आणि उपकरणेही पोलिसांनी ताब्यात घेतली.
जप्त साहित्यातून या रॅकेटचे नेटवर्क राज्यांच्या पलीकडे कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या ४७ जणांकडून चौकशी सुरू असून संपूर्ण पुरवठा व वितरण साखळीचा मागोवा घेण्यावर पोलिसांचा भर आहे.




