२४ नोव्हेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ नवीन स्थानकावर थांबणार… बारामती, फलटण, करमाळा प्रवास सुलभ

पुणे : मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार मुंबई-सोलापूर या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड स्थानकावर थांबा मिळाला आहे. येत्या २४ नोव्हेंबरपासून दररोज ही गाडी दौंड स्थानकावर थांबणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या नागरिकांच्या मागणीला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांसोबत साताऱ्यातील फलटण खटाव, सोलापूर जिल्ह्यातील कर्माळा, माढा, माळशिरस पट्ट्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने सोलापूर – मुंबई मार्गावर १० फेब्रुवारी २०२३ पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली. प्रवाशांच्या दृष्टीने सुलभ प्रवास होत असला, तरी पुणे शहरालगत असलेल्या दौंड, बारामती, इंदापूर, तसेच साताऱ्यातील फलटण, खटाव, सोलापुरातील करमाळा येथील स्थानिकांना या मार्गावर प्रवास करण्यासाठी थेट सोलापूर किंवा पुणे स्थानक गाठावे लागत होते. दौंड हे पुणे-सोलापूर पट्ट्यातील मध्यवर्ती ठिकाण झाले आहे, त्यामुळे आता प्रवाशांना दौंड येथून वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता येणे सहज शक्य होणार आहे.
हेही वाचा – व्यासपीठीवरील सावळ गोंधळ पाहून अजित पवार उठले अन्….
सोलापुर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास अवघ्या पावणे सात तासांचा ( ६.४५) प्रवास झाला आहे. विशेषतः दौंड – भिगवण- फलटण या भाग औद्योगिकदृष्ट्या महत्वाचा मानला जोता. त्याचबरोबर दौंड तालुक्यात असलेले साखर कारखाने वैद्यकी क्षेत्रातील कंपन्यांमुळे उद्योजक, व्यवस्थापक, अभियंते यांना मुंबईला त्वरेने जाता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग, कृषी क्षेत्रालाही मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
पुणे ते दौंड-सोलापूर या मार्गावर डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट (डेमू) धावत असून शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, वारंवार निर्माण होणारे तांत्रिक बिघाड, विलंब यामुळे स्थानिकांनी वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकाचा थांबा द्यावा अशी मागणी दीड ते दोन वर्षांपासून लावून धरली होती. तसेच मधल्या काळात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वे मंत्री आश्विनि वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला दौेंड स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे.




