सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात, तर सर्वात जास्त पाणीसाठा ‘या’ भागात

पुणे : उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यानंतर राज्याला पाणीटंचाईची चाहुलही लागली आहे. राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आता अर्ध्याहूनही कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
यात यंदा पुण्याच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा असून केवळ 39.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा मराठवाड्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याहूनही कमी असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मराठवाड्यात आता 42.90 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, धरणातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने अनेक धरणांचा पाणीसाठा एप्रिल मध्यापर्यंत उणे होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा चांगला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सोडण्यात येणारी आवर्तने, पिण्याचे पाणी, औष्णीक वीज केंद्रे आणि औद्योगिक कारणांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याने टंचाई निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा – ‘नदी प्रदूषण, रेल्वे संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी’; खासदार श्रीरंग बारणे
राज्याच्या नागपूर, अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकणातील एकूण धरणांमध्ये आज (8 एप्रिल) 43.67 टक्के सरासरी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 25 हजार 397 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या 42.90% पाणीसाठा शिल्लक आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात 49.86%, बीडच्या माजलगाव धरणात 38.13 % तर मांजरा धरणात 42.37% , हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात 61.10%, येलदरी धरणात 59.35%, नांदेडच्या विष्णूपुरी धरणात 39.87% पाणी शिल्लक आहे.
धाराशिवला उजनीतून पाणीपुरवठा होतो. सध्या उजनीमध्ये केवळ 19.31% पाणीसाठा शिल्लक आहे. उनजीचा पाणीसाठा एप्रिलच्या मध्यापर्यत उणे होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग आणि पाणीसाठा :
पुणे विभाग: 39.55%
मराठवाडा: 42.90%
नाशिक: 45.73%
कोकण: 51.13%
नागपूर: 43.52%
अमरावती: 51.43%