कुलगुरू यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभागाचा अचानक दौरा
अनुपस्थित असलेल्या कर्मचार्यांची नोंद घेत, कर्तव्याची आठवण करून दिली

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचे वाहन गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेदहाला थेट राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनाच्या पोर्चमध्ये पोचले. कुलगुरू उतरून थेट आत गेले. ‘टेबलवरच थांबा’ म्हणत कुलगुरूंनी प्रत्येक सेक्शनला भेट देऊन अनुपस्थित, लेटलतिफांची नोंद घेतली. तसेच कक्ष अधिकारी, कर्मचारी काय काम करताहेत, याचा अर्धा तास आढावा घेत खास शैलीत कर्तव्याची जाणीवही कुलगुरूंनी करून दिली.
कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांनी ता. चार डिसेंबरला अचानक सर्व विभागांना भेटी देत लेटलतिफांची ‘हजेरी’ घेतली होती. त्यानंतर बायोमॅट्रिक आणि हजेरी एकत्र जोडण्याचा निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली. शिस्त आणि निष्ठेने काम करण्यावर कुलगुरू वारंवार जोर देत असून, पुढच्या आठवड्यापासून अचानक वर्गात येऊन बसणार असल्याचेही त्यांनी नामविस्तारदिनी जाहीर केले. गुरुवारी कुलगुरूंचा ताफा थेट परीक्षा विभागात सकाळी साडेदहाला पोचला. उपस्थित कर्मचारी वेळेत जागेवर असतात की नाही, याची नोंद कुलगुरूंनी घेतली.
सकाळी १०.२० वाजता कर्मचारी उपस्थितीची वेळ आहे. विद्यापीठाची कार्यालयीन वेळ १०.३० ते सायंकाळी साडेसहा आहे. त्यात दुपारी २ ते २.३० ही भोजनवेळ आहे. तीन लेट मार्क असल्यास एक किरकोळ रजा कपात करण्यात येणार आहे. यासाठी बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नका
कुलगुरूंसमवेत कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांची उपस्थिती होती. कुलगुरूंच्या पाहणीच्या नोंदी आस्थापना विभागाने घेतल्या आहेत. यावेळी कुलगुरूंनी वेळेत या, चांगले काम करा. गाव-खेड्यांतून परीक्षा विभागात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या. कामे वेळेत पूर्ण करून सेवा द्या, अशा सूचना कुलगुरूंनी केल्या.
परीक्षा विभागात भेट दिली. बऱ्यापैकी उपस्थिती होती. कुलगुरू महोदयांनी सर्व विभागांत जाऊन पाहणी करून कामाचाही आढावा घेतला. अनुपस्थितांवर कारवाई होईल. त्यासाठी आस्थापना विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
–डॉ. प्रशांत अमृतकर,कुलसचिव.
हेही वाचा…
भरारी पथकाकडून अचानक ‘टेस्ट’; पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय
महाईन्यूज : संपादकीय लेख
नेतृत्व, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत: ‘आपत्कालीन कथा’
महाईन्यूज- X ट्विटर फॉलो करा :