चांदीत मोठी घसरण! तब्बल 12 हजारांनी भाव कोसळले; सोनंही झालं स्वस्त

Silver Price Crash : गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. विशेषतः चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा या मौल्यवान धातूकडे वळले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर अवघ्या पाच ट्रेडिंग सत्रांत चांदी तब्बल 12 हजार रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या दरातही मोठी घसरण दिसून आली आहे.वृत्तपत्र सदस्यता
MCX वर 17 एप्रिल रोजी 1 किलो चांदीचा भाव 2,57,142 रुपयांवर बंद झाला होता. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी चांदीचा भाव 2,44,321 रुपयांवर आला. म्हणजेच फक्त पाच दिवसांत चांदीच्या दरात 12,821 रुपयांची घसरण झाली.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, जानेवारी महिन्यात चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्या वेळी MCX वर चांदीचा दर 4,39,337 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. आता त्या उच्चांकी पातळीच्या तुलनेत चांदी तब्बल 1,95,016 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
हेही वाचा – 986 रन, 59 सिक्स, 16 कॅच सुटल्या…; एका दिवसांत IPL चा इतिहास-भूगोल बदलला, 2026 च्या हंगामात रचना नवा इतिहास
घरगुती बाजारातही चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, एका आठवड्यात चांदी सुमारे 6,115 रुपयांनी स्वस्त झाली. 17 एप्रिलला 1 किलो चांदीचा दर 2,49,940 रुपये होता, जो आता 2,43,825 रुपयांवर आला आहे.
सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली आहे. MCX वर 5 जून एक्सपायरी असलेल्या सोन्याचा दर 17 एप्रिलला 1,54,609 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तो आता 1,52,799 रुपयांवर घसरला आहे. म्हणजेच एका आठवड्यात सोन्याचा भाव 1,810 रुपयांनी कमी झाला.
जानेवारी महिन्यात सोन्यानेही विक्रमी पातळी गाठली होती. त्या वेळी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 2,02,984 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता त्या तुलनेत सोने सुमारे 50 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.
दरम्यान, ग्राहकांनी दागिने खरेदी करताना फक्त बाजारभावच नव्हे तर GST आणि मेकिंग चार्जचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण ज्वेलरी खरेदी करताना या अतिरिक्त शुल्कामुळे किंमत आणखी वाढू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही बाजार विश्लेषक सांगत आहेत.





