शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

पुणे : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीची अट लागू करण्यात आली आहे.
विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक ही नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द करून त्याऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. मात्र, नियमित नियुक्तीने कार्यरत चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत राहणार आहेत.
हेही वाचा – तब्बल ६१ हजार पगार, मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज मागवले, तरुणांनो, तातडीने अर्ज करा!
शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्याने ती कामे शिक्षकांना करावी लागतात. त्याचा अध्यापन, शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकेतर संवर्गातील काही पदांच्या नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, भरती प्रक्रियेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच, ही पदे १०० टक्के सरळसेवेने भरताना त्यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे.
प्रस्तावांतर्गत पदे १०० टक्के सरळसेवेने भरण्याबाबतची बिंदुनामावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करतेवेळी चतुर्थश्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही किंवा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणत्याही कर्मचाऱ्याकडे पदोन्नतीसाठी इच्छुक नसल्याचे प्रमाणपत्र बिंदुनामावली नोंदवहीसह सादर करणे आवश्यक आहे. चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्याच्या तक्रारींमुळे भरती प्रक्रियेस खीळ बसल्यास किंवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.