ओमानच्या आखातात अमेरिकेची मोठी कारवाई; इराणचे ‘तुस्का’ जहाज ताब्यात

Iran Cargo Ship Touska | ओमानच्या आखातात अमेरिकन नौदलाने मोठी लष्करी कारवाई करत इराणचा ध्वज असलेल्या ‘तुस्का’ (TOUSKA) या अजस्त्र मालवाहू जहाजाला अडवून ताब्यात घेतले. अमेरिकेने लादलेला नौदल वेढा तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या घटनेची पुष्टी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, इराणी कर्मचाऱ्यांनी इशारा न मानल्यामुळे अमेरिकन नौदलाने जहाजाच्या इंजिन रूममध्ये छिद्र पाडून ते थांबवले आणि जहाजावरील सर्व कर्मचारी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९०० फूट लांबीचे ‘तुस्का’ जहाज विमानवाहू युद्धनौकेइतक्या वजनाचे आहे. अमेरिकन नौदलाची मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका ‘यूएसएस स्प्रुआन्स’ (USS Spruance) हिने ओमानच्या आखातात हे जहाज अडवून थांबण्याचा इशारा दिला होता.
हेही वाचा : जगावर युद्धाचं सावट! इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; बुधवारी युद्धविराम संपणार?
या जहाजावर यापूर्वी संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या तिजोरी विभागाने निर्बंध लादले होते. सध्या जहाजातील मालाची तपासणी सुरू असून त्यामध्ये नेमका काय साठा आहे, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे अमेरिका-इराण संबंधांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील वर्चस्वासाठी दोन्ही देशांमध्ये संघर्ष तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
अलीकडील घडामोडींमध्ये इराणी दलांनी एका टँकरवर गोळीबार केल्याची तसेच कंटेनर जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने जहाजावर कारवाई केल्यानंतर इराणी दलांनी ड्रोनद्वारे अमेरिकन लष्करी जहाजांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केल्याचे वृत्तही समोर आले आहे.





