विरोधकांनी महिलांच्या अधिकारांची ‘भ्रूणहत्या’ केली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | संसदेमध्ये राज्यघटना (१३१वी दुरुस्ती) विधेयक २०२६ मंजूर होऊ शकले नाही. विरोधकांच्या एकजुटीमुळे हे विधेयक नामंजूर झाल्याने देशभर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग या विधेयकामुळे मोकळा होणार होता. मात्र विरोधकांच्या भूमिकेमुळे महिलांना आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही, असा आरोप करत फडणवीस यांनी “विरोधकांनी महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली,” असा घणाघात केला.
२०२३ मध्येच महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं. आताचं विधेयक हे घटनादुरुस्तीचे होते, मग आता कोणता कायदा करायचा होता? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या पेक्षा बाळबोध प्रश्न असू शकत नाही. २०२३ मध्ये जो कायदा केला होता, त्यामध्ये आपण २०२१ ची जगगणना धरली होती. परंतु, ही जनगणना पुढे होऊ शकली नाही. ही जनगणना २०२८ मध्ये पूर्ण झाली तर हा कायदा २०२९ ला लागू होणार नाही. त्यामुळे २०११ ची जनगणना आपल्याकडे उपलब्ध आहे, ही जनगणना २०२९ ला लागू होऊ शकते. त्यामुळे पुढच्या जनगणनेनंतर आकडेवारीप्रमाणे अंतर्गत बदल केले जाऊ शकतात. म्हणून जाणीवपूर्वक १० वर्ष विधेयक थांबवू शकत नाही.”
हेही वाचा : ओमानच्या आखातात अमेरिकेची मोठी कारवाई; इराणचे ‘तुस्का’ जहाज ताब्यात
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एनडीएजवळ दोन तृतियांश संख्याबळ असतं तर हे विधेयक एकमताने मंजूर झालं असतं. याला काँग्रेस, सपा, उबाठाने विरोध केला नसता. पण त्यांना यात संधी दिसली. त्यांनी चुकीच्या ठिकाणी संधी शोधली. त्यांनी दुसरं एखादं विधेयक पाडलं असतं तर विचारही केला असता पण त्यांनी महिला आरक्षण थांबवण्याचा प्रयत्न केला, ते निषेधार्ह आहे.”





