पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलिस’ योजनेची सुरुवात; १ हजार ५७४ गावांमध्ये प्रभावी पोलिसींग

पुणे : गावागावात पोलिस आणि नागरिकांमधील परस्परसंबंध अधिक दृढ करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पुणे ग्रामीण पोलिस दलाने ‘एक गाव, एक पोलिस पाटील, एक पोलिस अंमलदार’ या नावीन्यपूर्ण योजनेची अंमलबजावणी केली आहे. या उपक्रमाची सुरूवात १ मे रोजी करण्यात आली असून, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील संपुर्ण १ हजार ५७४ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत असून, यामध्ये १३ तालुके, ३३ पोलिस स्टेशन आणि १ हजार ५७४ गावे व बर्याच वाड्या वस्ताही सामाविष्ट आहेत. पोलिस ठाण्यांतून निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रत्येक गावासाठी एक पोलिस पाटील आणि एक पोलिस अंमलदार नियुक्त केले गेले आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश संबंधीत गावातील माहिती संकलन, जलद प्रतिसाद, तसेच नागरिकांशी थेट संवाद प्रस्थापित करणे हा आहे.
हेही वाचा – अखेर पुणे शहरात पाणीकपात: कात्रज, कोंढवा, सिंहगड रस्ता भागात कपात
महिला सुरक्षेसाठी तसेच सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती यावर योजनेचा विशेष भर राहणार आहे. योजनेचा उद्देश समुदाय पोलीसिंग अधिक सक्रीयपणे राबविणे आणि गावपातळीवरच संभाव्य गुन्ह्यांचे प्रतिबंध करणे असा आहे. पोलिसांचा जनतेशी संवाद वाढावा, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि गावकरी देखील पोलिस यंत्रणेचा भाग बनावेत अशी कल्पना या योजनेतून प्रत्यक्षात आणली जात आहे.





