‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पक्षाला कधी तीन आकडी आमदार संख्या गाठता आली नाही असा टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांविषयी केलेल्या विधानावरून पडळकर यांनी टोला लगावल्यानंतर या टीकेवरुन आता राष्ट्रवादीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूरमधील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबद्दल, “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यात काय गंमत होते ठाऊक नाही. एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते काही दिवसांनी पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, म्हटलं होतं. या विधानावर प्रतिक्रिया देताना पडळकरांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. पडळकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी उदाहरणं देत पवारांवर टीका केली.





