बर्ड व्हॅली गार्डनसमोर भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

पिंपरी-चिंचवड | चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डनसमोर भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकास अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सुभाष बन्सी ओव्हाळ (वय ४२) हे त्यांची दुचाकी (एमएच १४ डीजी ७२६४) घेऊन थरमॅक्स चौकातून बर्ड व्हॅली चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पो ट्रक (एमएच ०४ एफयू ६६५५) चालकाने वेगात, निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली.
हेही वाचा : ‘झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए’; भोंदूबाबा अशोक खरातची धक्कादायक कबुली
धडकेनंतर टेम्पो ट्रक ओव्हाळ यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या डोक्याला, कपाळाला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी त्यांचा मुलगा अजय सुभाष ओव्हाळ (वय २३, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली असून संतोष सुभाष दळगडे (वय ४५, रा. चिखली) या टेम्पो चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.





