पुणे महापालिकेची खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस
रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये

पुणे : पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस पाठविली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये.
रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार न केल्याने तनिषा भिसे या गरोदर मातेच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली. पैशांच्या मागणीवरून रुग्णाचा जीव गेल्याच्या या घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी रुग्णालयाच्याविरुद्ध तीव्र आंदोलने केली.
हेही वाचा – त्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा?
दरम्यान, रुग्णालयाने या प्रकरणाची दखल घेत तातडीच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर पुणे महापालिकेला अखेर जाग आली आणि महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.
तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना ताटकळत ठेवून रुग्णालये अनामत रक्कम भरण्यासाठी रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करतात. उपचार वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमावण्याची वेळ येते. तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर या प्रकरणातील गांभीर्य अधिक स्पष्ट झाले.
त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. तातडीच्या उपचारांसाठी नातेवाईक त्यांच्या रुग्णांना घेऊन येतात, त्यावेळी त्यांच्याकडून अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नये. रुग्णावर तातडीने उपचार करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीना बोराडे यांनी सांगितले.
पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालये यांना संबंधित नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व शुश्रुषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीवित रक्षणाच्या सेवा द्यावी व जीवित रक्षणासाठीच्या सुवर्णकालिन उपचार पध्दतीचे, निकषांचे पालन केले जाईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.
टोल फ्री क्रमांकावर करा संपर्क
रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन ने केल्यास या १८००२३३२१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
आरोग्य विभागाकडून ८९ रुग्णालयावर कारवाई
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील ८६० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीस दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८९ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, संबंधित रुग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे.