सदावर्ते यांची शेलक्या शब्दांत राज ठाकरे यांच्यावर टीका
मनसेच्या पदाधिकाऱ्याची सदावर्तेंना धमकी!

नाशिक : अॅड. गुणरत्न सदावर्ते हे वारंवार आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत ते म्हणजे एका व्हायरल ऑडिओ क्लीपमुळं. या ऑडिओ क्लीपमध्ये मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं सदावर्ते यांना धमकी दिल्याचं ऐकायला मिळत आहे. तसंच सदावर्ते यांनी देखील त्याला प्रत्युत्तर देताना इशारा दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्यात राडा घालायला सुरुवात केली. मुंबईत मराठी बोलायला नकार देणाऱ्या एअरटेल प्रकरणं असेल किंवा बँकांमधील अधिकाऱ्यांना धमकावणं असेल. यापार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टिकेवरुन नाशिक जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी सदावर्ते यांना फोन करुन आर्वाच्च भाषेत धमकावलं. त्यांच्या डोळ्यावरुन, दिसणाऱ्यावरुन त्यांना हिणवण्यात आलं. तसंच नाशिकमध्ये येऊन दाखवं तुला दाखवतो, अशा शब्दांत धमकीही दिली.
हेही वाचा – त्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा?
दरम्यान, यावेळी घोडके यांना प्रत्युत्तर देताना फोनवरुनच सदावर्ते यांनी मनसैनिकांना इशारा दिला. त्यांनी म्हटलं की, तुम्ही काहीही करा पण अशानं मला फरक पडणार नाही. तुम्ही माझं काहीही वाकडं करु शकत नाहीत. माझ्या नादाला लागायचं नाही. मै हिंदू बोलू, गुजराती बोलू किंवा मराठी बोलू मेरी मर्जी.
सदावर्ते काय म्हणाले होते?
गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना स्टँडअप कॉमेंटेटर असं म्हटलं होतं. त्यांच्या मनसेसारख्या पार्ट्या गल्लोगल्ली असतात. मुंबईत किली लोक मराठी आणि अमराठी आहेत, याचा अभ्यास राज ठाकरेंनी करावा, असंही सदावर्ते यांनी म्हटलं होतं.