Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे | जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची चिन्हे असून हवामान विभागाने २१ जुलैसाठी विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यासोबतच मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्रीय हवामान प्रणालींमुळे मोसमी वाऱ्यांना मोठा वेग मिळाला आहे. सोमवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी सुरुवातीला यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर अचानक वाढल्याने हवामान विभागाने तातडीने तो ‘ऑरेंज अलर्ट’मध्ये बदलला.

रायगड, रत्नागिरीत सतर्कतेचा इशारा

कोकण किनारपट्टीवर या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी २१ जुलै रोजी अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीएवढा पाऊस नसला तरी पावसाचा जोर चांगला राहील.

हेही वाचा

संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर पावसाचा जोर

पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ आणि घाट परिसरात पावसाचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तिथे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून इथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

दुसरीकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे.

विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा

राज्याच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असला तरी विदर्भात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये केवळ हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button