‘मंडई मेट्रो’ स्थानकाला भीषण आग

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या मेट्रो स्थानकाचे उद्घाटन झाले होते.
या घटनेत मेट्रो स्थानकाचं मोठं नुकसान झालेलं असलं तरी कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही. मेट्रो स्टेशनच्या वरच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांनी या घटनेची तातडीने माहिती घेतली. दरम्यान, मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
हेही वाचा – समीर भुजबळ मविआच्या वाटेवर? छगन भुजबळ म्हणाले..
या घटनेनंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितले की, ‘मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. ही घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला.
या संदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून, या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं मेट्रो प्रशासनाकडून कळविण्यात आलं आहे,’ अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.





