‘मी आहे तिथेच आहे, मला झोपही लागते’; हर्षवर्धन पाटील यांची मिश्किल टिप्पणी

पुणे: ‘मी सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. मी आहे तिथेच असून, माझी कामे सुरू असतात आणि मला झोपही लागते, काही अडचण नाही. तुम्हाला झोप लागते म्हटल्यावर मलाही झोप लागते, अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादीचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
साखर संकुल येथे आले असता, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीनंतर तुमचे चाललेय काय? मध्यंतरी तुम्ही सागर बंगल्यावर जाऊन आल्याची चर्चा झाल्याबद्दल प्रश्न छेडला असता ते म्हणाले, ‘माझे काम सुरू असून, मी सार्वजनिक जीवनात काम करणारा कार्यकर्ता आहे.
हेही वाचा – वाकड-हिंजवडी भागातील वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून पीएमआरडीए करणार नवीन रस्ते व वाहतुकीचे नियोजन
माझी बरीच कामे सुरू असतात. निवडणुकीत हार-जीत होत असते. भाजप नेते व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आपण भेट घेतली. पुन्हा स्वगृही जाणार असल्याबद्दल छेडले असता ते म्हणाले, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या साखर संकुलामधील बैठकीसाठी मी आज आलो होतो.
हेही वाचा – ‘सैफ अली खानवरील हल्ल्यावर राजकीय भाष्य उचित नाही’; दादा भुसे
राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा साखर संकुल येथे आल्याचे कळले. ते आमचे मित्र असून, साखर आयुक्तांसह अन्य अधिकारीही भेटीवेळी तिथे उपस्थित होते. त्यात वैयक्तिक-खासगी भेट नव्हती. आम्ही सर्वांनी एकत्र चहा घेतल्याचे ते म्हणाले.