राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम

मुंबई : राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
हेही वाचा – ‘अंगणवाडी आहार दरवाढ, कर्मचारी निवृत्ती वयवाढीसह विविध मागण्यांवर शासन सकारात्मक’; मंत्री आदिती तटकरे
‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पाडू” असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास न ठेवता स्वतः च्या मनाने औषधांचे सेवन करू नये. सेल्फ मेडिकेशनमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे अशा उत्पादनाबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन आयुक्तांनी केली आहे.





