किल्ल्यावरील पर्यटनात गोंधळ पडला महागात, मधमाश्यांचे मोहोळ उठले
मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी, एकाचा मृत्यू

कर्नाळा : कर्नाळा किल्ल्यावर शनिवारी धक्कादायक प्रकार घडला. किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या ४० ते ५० पर्यंटकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मधमाशांचे मोहोळ उठले. मधमाशांनी केलेल्या हल्यानंतर धावपळ उडली. त्यात एकाचा मृत्यू झाला. तसेच मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रायगडमधील पनवेल तालुक्यात कर्नाळा किल्ल्यावर नेहमी पर्यटकांची गजबज असते. या किल्ल्यावर शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. १५ फेब्रुवारी रोजी ट्रेकिंगसाठी किल्यावर आलेल्या पर्यटकांपैकी संदीप गोपाळ पुरोहित यांना प्राण गमवावे लागले. मधमाशांच्या हल्ल्यात अजून पाच पर्यटक जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : ‘पीसीसीओई’च्या टीम क्रॅटोस रेसिंगचा फॉर्म्युला भारत-2025 मध्ये विक्रम!
अशी घडली घटना
शनिवारी सकाळी सुट्टी असल्याने शेकडो पर्यटक कर्नाळा किल्यावर आले होते. यामध्ये मुंबई येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचा मोठा समूह आला होता. त्याचसोबत काही पालक आपल्या मुलांना कर्नाळा किल्यावर पर्यटनासाठी घेऊन आले होते. ४० ते ५० पर्यटकांचा गोंधळ किल्ल्यावर झाला. त्यामुळे मधमाशा भडकल्या. त्यांनी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटकांमध्ये धावपळ उडाली. पर्यटनासाठी आलेले ४४ वर्षीय संदीप पुरोहित नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहतात. त्यांच्या डोळ्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्यानंतर संदीप पुरोहित सैरावैरा धावू लागले. त्या गोंधळात दगड त्यांच्या डोक्यावर पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला. त्यांना उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना समजल्यावर त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोने यांच्यासह घटनास्थळ गाठले. या दरम्यान जखमींनी रुग्णवाहिकेसाठी १०८ वर संपर्क साधल्याने त्यांना वेळीच मदत मिळाली. मधमाश्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.