PCMC | महापालिकेच्या आरोग्य समितीला ५० लाखांपर्यंत निर्णयाचे अधिकार!
पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यतेची प्रतिक्षा

शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांच्या संकल्पनेला बळ
पिंपरी- चिंचवड |
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य व वैद्यकीय समितीला ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव येत्या १५ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिका सभेने ५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३०(१) अन्वये आरोग्य व वैद्यकीय समिती या विशेष समितीच्या स्थापनेस मान्यता दिली होती. आता या समितीचे कामकाजाचे क्षेत्र, अधिकार व कर्तव्ये निश्चित करण्यासह आर्थिक अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार, आरोग्य व वैद्यकीय समितीला १० लाख रुपयांपेक्षा अधिक आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. तसेच ५० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रस्तावांबाबत महापालिका सभेकडे शिफारस करण्याचे अधिकार समितीला देण्यात येणार आहेत.
हेही वाचा
मुंबईचा पाऊस जगात भारी! पाच दिवसांत तब्बल ९२० मिमी पाऊस
या निर्णयामुळे आरोग्य विभागातील विविध विकासकामे, वैद्यकीय सुविधा, उपकरणांची खरेदी, रुग्णालयांशी संबंधित कामे आणि नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रस्तावांवर अधिक वेगाने निर्णय घेणे शक्य होणार आहे. सध्याच्या प्रशासकीय प्रक्रियेमध्ये लागणारा वेळ कमी होऊन आरोग्यविषयक कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या विषयासंदर्भात नगरसेवक कुशाग्र कदम आणि ज्ञानेश्वर जगताप यांनी प्रस्ताव सादर केला असून, विधी समितीने ६ जुलै २०२६ रोजीच्या ठराव क्रमांक १४ द्वारे त्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर आता हा विषय अंतिम मंजुरीसाठी १५ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, आरोग्य व वैद्यकीय समिती स्थापन करण्याची संकल्पना शहर सुधारणा समितीचे सदस्य तथा डॉ. सुहास कांबळे यांनी मांडली होती. शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र निर्णयक्षम समितीची आवश्यकता त्यांनी मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला महापालिकेने मान्यता दिल्यानंतर आता समितीला आर्थिक अधिकार देण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे.
आरोग्य क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी ही समिती महत्त्वाची ठरणार असून, पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी तिची भूमिका निर्णायक राहणार आहे.
“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने आरोग्य व वैद्यकीय समितीची संकल्पना मांडण्यात आली होती. या संकल्पनेला आमदार महेश लांडगे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. आरोग्य क्षेत्रातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, तातडीच्या कामांना वेग मिळावा आणि महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करता यावे, हा या समिती स्थापनेमागील मुख्य हेतू आहे. समितीला ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्याचे अधिकार मिळाल्यानंतर आरोग्यविषयक कामांना निश्चितच गती मिळेल. रुग्णालये, वैद्यकीय सुविधा, उपकरणांची उपलब्धता आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल. शहराच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने हे महत्त्वाचे पाऊल पुढे जात आहे.”
– डॉ. सुहास कांबळे, सदस्य, शहर सुधारणा समिती.





