एक्झर्बिया अॅबोडमध्ये गणेशोत्सव 2025ची धमाकेदार तयारी; रहिवाशांचा उत्साह शिगेला
सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, आरोग्य शिबिरे, रक्तदान उपक्रमांसह भव्य उत्सव; मंडळाचा ‘शिस्त आणि सौहार्द’चा संकल्प
वडगाव मावळ : जांभुळगाव येथील एक्झर्बिया अॅबोड रहिवाशी संकुलात यंदाही गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ज्ञान, बुद्धीचे प्रतीक आणि विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण सोसायटी सज्ज झाली असून, मंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने भरगच्च कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर केली आहे.
मंडळाचे अध्यक्ष अनंत भानुदास गुळवे यांनी सांगितले की, “यंदाचा उत्सव केवळ भव्यच नव्हे, तर शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक असेल. रहिवाशांनी उत्साहाने आणि स्वेच्छेने सहभागी होऊन या मंगलपर्वाला दिव्य स्वरूप द्यावे.” उपाध्यक्ष सोमेवश्वर काळे यांनी कार्यक्रम वेळेत आणि नियोजनबद्धपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले. तर खजिनदार धनंजय चंद्रकांत वाणी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गेली चार वर्षे सामाजिक उपक्रम राबवित असताना अनेक बरे-वाईट अनुभव आले. मात्र यंदाचा उत्सव हा उत्साहपूर्ण आणि साकारात्मकतेला साजेसा असणार आहे. सोसायटीतीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील गणेश भक्तांना नाविन्यपूर्ण संदेश कसा जाईल, याची पूरेपूर जाणीव ठेवून या वर्षी आम्ही आमच्या संकुलातील गणेशोत्सव अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहोत. या मध्ये लहान-थोर, महिला-पुरुषांनी आनंदाने सहभागी व्हावे, असेही आवाहनदेखील वाणी यांनी केले आहे.
हेही वाचा : सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील
उत्सवाची वैशिष्ट्ये:
यंदा गणेशमूर्ती ही 6 फुटांची असून, लालबागच्या राजाची प्रतिकृती असणारा विलोभनीय बाप्पा भक्तांच्या आकर्षणाचा व भक्तीभावाचे प्रतिक ठरणारा असेल. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी बाप्पाच्या आगमन व प्रतिष्ठापनेपासून उत्सवाची सुरुवात होईल. पुढील दहा दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल असेल. भजन, स्लो सायकलिंग, लिंबू-चमचा, रस्सी उडी, चित्रकला, रांगोळी, पाककला, डान्स स्पर्धा, पोवाडा, व्याख्यान, कविता, पैठणीचा खेळ यांसह लहानग्यांसाठी स्मार्ट किड्स कार्यक्रम होणार आहेत.
३१ ऑगस्टला रक्तदान शिबीर व आयुर्वेद आरोग्य शिबीर, ६ सप्टेंबरला ज्येष्ठ नागरिक सत्कार, बक्षिस वितरण सोहळा आणि गणेश विसर्जन मिरवणूक ही विशेष आकर्षणे असतील. सर्व कार्यक्रमांची वेळ व शिस्त याबाबत विशेष लक्ष दिले जाणार असून, आरती दररोज सायंकाळी ७.३० ते ८ वाजेपर्यंत होईल.
सामाजिक भान व सौहार्दाचा संदेश:
मंडळाने यंदाच्या उत्सवात सौहार्द, शिस्त आणि एकोपा जपण्याचा संकल्प केला आहे. सर्व वयोगटातील रहिवाशांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले असून, या भव्य आयोजनामुळे एक्झर्बिया अॅबोड गणेशोत्सव 2025 हा केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक व सामाजिक ऐक्याचा आदर्श ठरणार आहे.





